disabled.. books and stories free download online pdf in Hindi

अपंग..

गेल्या काही वर्षात त्याच्या वयाने जरा जास्तच वेगाने टप्पे पार केले आहेत. सगळ्या घटना अशा काही घडत गेल्या की जणू वेळ अगदी कमी होता आणि घडणाऱ्या घटना खूप अधिक. त्यामुळे दोन घटनां मधलं अंतर कमी कमी होत गेलं आणि तो हतबुद्ध होऊन फक्त बघत राहिला. घडत असणाऱ्या या घटनांमध्ये मग अशा काही अघटीत गोष्टी घडल्या, की उन्मळून पडला तो. लढण्याची इच्छा, आकांक्षा, मनोबल सगळच कमी होऊ लागलं आणि त्याला हरण्याची सवय होऊ लागली. हार जणु काही त्याच्या अंगवळणीच पडली. जिंकणे हे त्याच्या परिघाच्या बाहेरच्या गोष्टीत जमा झाले.

तशी सुरुवातीपासूनच खूप रंगीबेरंगी स्वप्न त्याने कधीच बघितली नव्हती, ना त्याला कधी पंख लावून उडण्याची आस होती. आकाशाला गवसणी घालण्याची न त्याची आकांक्षा होती न क्षमता. जमीन दान मिळत असेल तरी याची वृत्ती हीच की फक्त जरुरतीपुरतीच हवी. भव्य-दिव्य, उदात्त गोष्टींमध्ये त्याने कधीच सुख शोधलं नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यातच समाधान शोधणे म्हणजे पाप थोडंच आहे?

माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला गाव सोडावं लागलं कारण पुढच्या शिक्षणाकरता गावामध्ये काही व्यवस्था नव्हती. वडील सरकारी नोकरीत, सतत बदली होत राहायची. पद-प्रतिष्ठा नसली तरी उदरनिर्वाह व्यवस्थित होत असे. खाण्यापिण्याची काही कमतरता नव्हती आणि तसंही जोपर्यंत आई-वडील असतात तोवर मुलांना फिकीर तरी कुठे असते? त्या गोष्टीही वेगळ्या आणि ते दिवसही वेगळे!

आयुष्यातल्या या टप्प्यातल्या रम्य दिवसांची जेव्हा जेव्हा आठवण यायची तेव्हा तो रडू पण नाही शकायचा. का कोणास ठाऊक पण अशा गोष्टींवर रडणं म्हणजे त्या दिवसांचा अपमान करण्यासारखं वाटायचं त्याला. बालपणीचा तो सुखाचा काळ; दुःखाशी, रडण्याशी दूर दूर पण संबंध नसणारा. ते रम्य दिवस, ज्यांच्या आठवणीत हजारो अश्रू पुसण्याची ताकद आहे, ते दिवस ज्यांची आठवण अश्रुंच्या महासागरातून सुध्दा ओठावर हास्य आणू शकते, ते दिवस, ज्यांच्या आठवणींच्या महापुरात पाषाणाला पण पाझर नाही फुटला तरच नवल ...

त्याचे वडील म्हणायचे की आकाशात सोडलेला बाण ना शिकार करू शकतो ना तो परत येऊ शकतो आणि जर चुकून तो बाण शिकार जखमी करू शकलाच तरी शिकार काही आपल्या हाती लागत नाही. म्हणूनच आकाशात उडण्याच्या गप्पा करू शकतो पण आकाशाला जमिनीवर कधीच आणता येत नाही. त्याच बरोबर हे पण सांगायचे की फक्त जमिनीवरतीच नजर खिळवून ठेवण्यातही कोणतीच चतुराई नाही. हा सुद्धा तर एक प्रकारचा डोळ्यांचा अपमान करण्यासारखंच आहे. चतुर मुलगा या दोन्ही गोष्टींच्या मधले अंतर अचूक जाणून होता. हेच कारण होतं की कॉलेजच्या पहिल्या वर्षातच त्याने व्यावहारिक जगात आपले पाय रोवण्याची खूणगाठ बांधली होती. आणि या विचारांना ना कधी स्वपनाळूपणें बघितलं, ना आपल्या मेहनतीमध्ये काही कसर सोडली.

सरकारी नोकरी मिळविणे ही त्याची महत्त्वाकांक्षा बनली. उच्चस्तरीय नाही पण निदान तहसीलदार खात्यात तरी. वडील हे ऐकून अगदी धन्य झाले होते. आपल्या मुलाला दुनियादारी समजते, तो जगातल्या भल्या-बुऱ्या गोष्टींपासून अपरिचित नाही, याचा त्यांना आनंदच झाला होता. नेहमी त्याला त्यांनी प्रोत्साहितच केलं. आधी सुद्धा बरेच वेळा मुलाच्या समोर आपल्या मित्रांच्या गोष्टी, किस्से मुद्दाम सांगत असत. पुढे त्या मित्रांबद्दल जास्त किस्से, गोष्टी सांगितल्या जायच्या जे अत्यंत निश्चिंत मनाने सरकारी नोकरी मध्ये दिवस घालवत होते. शिवाय तहसीलदारी तर त्यांच्या नजरे मध्ये अत्यंत आदर्श सरकारी नोकरी होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ही होती की मुलाला स्वतःचे तहसीलदारी मध्ये येणे म्हणजे अजिबात हवेतला गोळीबार नव्हता. सामान्य विद्यार्थ्यांपैकी असला तरी मुलगा अत्यंत मेहनती होता.

एक दिवस एक जीप शेजारच्या घरासमोर येऊन थांबली होती आणि त्यातून एक शिपाई पळत पळत पानवाल्याच्या जवळ आला होता, तेव्हा तो तिथेच उभा होता. शिपाई अत्यंत संतप्त होऊन पान वाल्याला काय वाटेल ते बोलत होता. त्याला आश्चर्य वाटत होतं की हा साधा फक्त चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी, वयानेही काही खूप मोठा नाही, आपल्याला वडील शोभतील अशा या पान वाल्याला, जो कोणत्याही प्रकाराने त्याच्याहून दुय्यम नाही, कर्जदार नाही, वाटेल ते ऐकवीत आहे आणि आश्चर्याची गोष्ट ही होती की पानवाला स्वतःचे काही समर्थन करण्याच्या ऐवजी चुपचाप सर्व काही ऐकून घेत होता. शिपायाचा राग थोडा कमी झाला आहे असं वाटल्यावर त्याने हळूच पानाची एक पुडी त्याच्या हातात दिली आणि इकडे तिकडे बघत, काहीतरी पुटपुटत तो शिपाई तिथून निघून पण गेला. तो गेल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्या. त्याचं झालं असं होतं की तहसीलदाराची झाली होती बदली. आधीचा तहसीलदार तीनशे नंबरचे पान खायचा. त्यांच्याकडून चार्ज घेण्याकरता नवा तहसीलदार आला आणि नवीन साहेबा करता पान आणायला जो मुलगा पाठवला त्याने फक्त इतकच सांगितलं की तहसीलदार साहेबांच्यासाठी वीडा पाहिजे. आता बिचाऱ्या गरीब पानवाल्याला काय माहिती की साहेबांची बदली झाली आहे. त्याने नेहमीप्रमाणे मस्त सुगंधित विडा बनवून दिला. त्याचाच परिणाम हा होता की इतका नगण्य माणूस, आपल्या व्यवसायाचा एकछत्र अंमलदार असणाऱ्याला सर्वांसमोर वाटेल ते ऐकवून गेला होता आणि लोक उभ्या उभ्या सर्व तमाशा बघत राहिले होते.

सर्व गोष्ट समजल्यानंतर त्याच्या ओठावर हलकेच हसू उमटले होते. इतक्यात त्याची नजर समोर उभ्या असलेल्या जीपवर गेली, ज्यात पांढरा-शुभ्र झब्बा पायजमा घातलेला तो पोरगेलासा दिसणारा साहेब बसला होता. काही लोक म्हणत होते की राज्य तहसीलदार सेवेमध्ये हा साहेब आता नुकताच पास होऊन आला आहे. त्याची ही पहिलीच पोस्टिंग आहे. अत्यंत मेहनती आणि निडर माणूस आहे. तेवढ्यात जीप चालू झाली आणि जे धुळीचे लोट उठले ते पार वर पर्यंत पोचले. ह्याच धुळीच्या लोटामध्ये तो आपले मनसुबे आजमावत राहिला, उभ्या उभ्या.

बी. ए. ची परीक्षा पास झाल्यानंतर त्याने नोकरीकरता पुढे कुठेच अर्ज केला नाही. सरळ गावात परत आला. वडिलांना पण ही गोष्ट अगदी योग्य वाटली कारण जर त्याला तहसीलदारीच्या परीक्षेची तयारी करायची असेल तर शहरात उगीचच एकटं राहण्याची जरुरत काय? तिथे भाड्याने घेतलेली खोली पण त्याने सोडली आणि गावात येऊन परीक्षेचा अभ्यास करण्यात मग्न झाला. दिवस रात्र एक केले. झपाटल्यासारखा सकाळपासून संध्याकाळ पर्यंत आणि संध्याकाळपासून सकाळपर्यंत चालू असलेला त्याचा अभ्यास बघून आईला थोडी चिंता वाटू लागली. येऊन म्हणायची,"अरे बाळा, अशाने डोळ्याच्या खाचा होतील. जा, जरा थोडा वेळ बाहेर फिरून ये. आल्यावर जेवून खाऊन परत अभ्यासाला बस." दोन्ही धाकट्या भावंडांच्या समोर याचे उदाहरण ठेवले जायचे की बघा, असा अभ्यास करायचा असतो, याला म्हणतात मेहनत!

त्याच्या आठवणीत होते ते दिवस जेव्हा सकाळी, दुपारी, संध्याकाळी बघावं तेव्हा डोळ्यासमोर फक्त पुस्तकंच दिसायची. एक खाली ठेवायचं आणि दुसरं उघडायचं. आपल्या छोट्याशा खोलीतल्या कॉटवर पुस्तकांच्या ढीगामध्येच सगळा दिवस निघून जायचा. दुपार होताच कोपऱ्यातलं स्टूल भिंतीची बाजू सोडून त्याच्या कॉट जवळ यायचं आणि त्यावर झाकलेल्या ताटात आई जेवण ठेवून जायची. बराच वेळ झाकलेलं ताट तसंच पडून राहायचं, आई मधून मधून डोकावून जायची. कधी कढी किंवा वरण परत गरम करून आणायची. त्याचं जेवण झालं की थोड्यावेळाने ती ताट-वाटी घेऊन जायची आणि स्टूल परत भिंतीजवळ जायचं. दुपार संपता संपता चहाचा कप परत स्टुला वर ठेवलेला मिळायचा.

खूप वेळा दमून त्याला डुलकी लागायची. जाग आल्यावर थोडं ताजतवानं वाटायचं पण बाहेर फिरून यावं असं नाही वाटायचं. त्यापेक्षा एखादं हलक्याफुलक्या विषयाचं पुस्तक हातात घेऊन चहाचे घोट घेत घेत खुर्चीवर पाय पसरून बसायला त्याला जास्त आवडायचं.

संध्याकाळी तो घरा बाहेर पडायचा. कधी एखादा मित्र भेटायला यायचा तर कधी आई त्याच्या हातातलं पुस्तक घेऊन टेबलावर बंद करून ठेवायची. पटकन उभा राहात, तोंडावर पाण्याचे हबके मारून तो कपडे बदलायचा आणि घराजवळच असलेल्या छोट्याशा बाजारात चक्कर मारून यायचा. कोणी ना कोणी तर तिथे हमखास भेटायचंच.

रात्रीची जेवणं आटोपली की सगळेजण गच्चीवर झोपायला जायला निघायचे. तेव्हा मात्र त्याला कसंतरीच व्हायचं त्या छोट्याशा खोलीत बसताना. दिवसभर पंख्याच्या वाऱ्यात राहिल्याने हात-पाय पण जरा आखडल्यासारखे वाटायचे. पण गच्चीवर दिवा नव्हता, त्यामुळे त्याला खोलीतच अभ्यास करावा लागायचा. जसजशी रात्र चढत जायची तसतसे आजूबाजूच्या घरांमधले दिवे एक एक करत बंद होऊ लागायचे. पण उकाडा मात्र अजिबात कमी नाही व्हायचा. बनियनवरच बसून तो अभ्यास करत रहायचा. उकाडा अगदीच असह्य होऊ लागला तर पायजमा सुद्धा काढून ठेवायचा आणि मस्तपैकी अंडरवेअर-बनियन मध्ये खुर्चीवर बसून अभ्यास सुरू ठेवायचा.

त्या दिवशी रात्री तो असाच बसून अभ्यास करत होता जेव्हा समोरच्या घरामधला दिवा अचानक लागला. खिडकीचा पडदा थोडावेळ तसाच सोडलेला होता पण थोड्या वेळातच एका नाजुक हाताने तो पडदा बाजूला सरकविला. मग जवळचा टेबललॅम्प सुरू झाला आणि खोलीतला मगाशी लावलेला दिवा बंद झाला. खिडकीच्या जवळ असलेल्या टेबलापाशी आता एक आकृती येऊन पुस्तक उघडून बसली.

तलाठ्याची मुलगी होती ती. मॅट्रिकची परीक्षा देत होती. आजूबाजूची मुलं म्हणायची की रात्र रात्र जागून अभ्यास करते, तरीसुद्धा दोन वर्ष नापास होत होती. मॅट्रिकच्या परीक्षेचे हे तिचे तिसरे वर्ष. अभ्यास करण्याची तिची अशी एक खास पद्धत होती. गजर लावून रात्री जरा लवकरच ती झोपायची आणि मग मध्यरात्री उठायची. चेहर्‍यावर पाणी मारून मारून झोपेला पळवून लावायची आणि अभ्यासाला बसायची. दिवसा एक शिक्षक घरीच शिकवायला यायचे.

सुरुवाती सुरुवातीला त्या मुलीच्या समोर असं बनियन वर बसताना थोडं लाजिरवाणं किंवा विचित्र वाटलं होतं. पाणी पिण्याच्या बहाण्याने तो उठला होता आणि खोलीत आत जाऊन कपडे घालून परत आला होता. पण दोन चार दिवसातच त्याच्या लक्षात आलं की इतका सभ्यपणा दाखवण्याइतकी काही ही मुलगी सालस नाही. एक दिवस त्याच्या हे पण लक्षात आलं की मुलीची नजर पुस्तकात कमी आणि इकडे तिकडेच जास्त असते. खूप खूप वेळ ती त्याच्याकडे टक लावून बघत असते. एक दोन दिवस त्याने दुर्लक्ष केलं पण मग नंतर रात्रीच्या नीरव शांततेत त्याला काही हालचाल जाणवू लागली. ती मुलगी ज्या तऱ्हेने त्याच्याकडे टक लावून बघायची आणि सारखी आपला दुपट्टा काढून टेबलावर ठेवून द्यायची, त्याने याच्या मनातले स्त्री दाक्षिण्य अजूनच कमी झाले. मग त्याला खिडकीच्या समोर बसताना पायजमा घालून बसायची जरुरी वाटेनाशी तर झालीच, उलट एक दिवस त्याच्या मनात आलं की…

परीक्षेच्या दिवसांमध्ये तिथे लू म्हणजे अतिशय गरम वारे वहात असायचे. त्या वर्षी तहसीलदारी मध्ये त्याचा नंबर काही लागला नाही.

खूप दुःखी झाला होता तो. वडलांनी वर वर तर त्याला दिलासा देत सांगितलं होतं की काही हरकत नाही, पुढच्या वेळेस अजून मेहनत कर. पण आतून मात्र त्यांचा गळा अगदी दाटून आला होता. कदाचित त्यांना हे माहीत होतं की मुलाने मेहनतीत तर कोणतीच कसर सोडलेली नाही, पुढे देवाची इच्छा! आई तिचा परीक्षेवरचा संताप अजिबात लपवत नव्हती -- जळली मेली ती परीक्षा.. असली कसली ही परीक्षा दिवस-रात्र एक करून सुद्धा पास होता येत नाही. सगळा अंधाधुंदीचा कारभार आहे झालं. सर्व कामे आजकाल देवाण-घेवाण करूनच होतात. दोन्ही छोट्या भावांच्या चेहऱ्यावर एक भोळं भाबडं कौतुक होतं की इतका अभ्यास करून सुद्धा कोणी नापास पण होतं! छोट्याला एकटा बघून त्याने छोट्याची समजून पण घातली होती की या परीक्षांमध्ये पास किंवा नापास असं नसतंच मुळी. खूप सारे लोक परीक्षेला बसतात, जागा अगदी कमी असतात, त्यामुळे सगळ्यांचा नंबर नाही लागत. पण मधल्या भावाला मात्र तो हे समजवू शकला नव्हता. त्याच्या डोळ्यात आपल्या भावाची हार झाली आहे ही भावनाच कायम उरली.

दुसऱ्या वेळी परीक्षेला बसताना एका वर्षाचा बेरोजगारीचा ठप्पा आता त्याच्यावर लागला होता. वडिलांच्या जवळजवळ येत जाणाऱ्या निवृत्तीचे आता त्याला भय वाटू लागले होते. तरीपण त्याने परीक्षा पास होण्याचा चंग बांधला. आता हेच जगण्याचे उद्दिष्ट असं एकदा ठरविल्यावर इतक्या सहजासहजी थोडीच हार मानता येते? त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा निर्धार केला आणि मग अचानक ही घटना घडली की सर्व काही मिटले जाऊन आयुष्य नव्याने लिहिलं गेलं. एकाच क्षणात अनेकांची आयुष्य इतक्या वाईट तऱ्हेने बदलून जाऊ शकतात, त्याने कधी विचारही केला नव्हता.

ते सर्वजण एका लग्नाहून घरी परत येत होते , तो होता, बरोबर दोन्ही लहान भाऊ आणि आई-वडील. जोराचा पाऊस होऊन गेला होता आणि रस्ता अनेक ठिकाणी उखडला गेला होता. ड्रायव्हरच्या फाजील आत्मविश्वासाला निमित्त बनवून नियतीने त्याचा भविष्यकाळ तिथल्या तिथेच चिरडून टाकला. वडील अपघात स्थळीच मरण पावले. आई बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलपर्यंत पोहोचली परंतु तेथे मरण पावली. कालव्याच्या पाण्यातून बाहेर काढलेल्या मृत लोकांमधून मधल्या भावाचा चेहरासुद्धा ओळखता येऊ शकला नाही. त्याच्या कपड्यांवरून खात्री पटवता आली. लहान भाऊ वाचला, अगदी सही सलामत. साधा ओरखडा सुद्धा उठला नाही त्याच्या अंगावर आणि जणूकाही हे सगळं बघण्याकरता, सहन करण्याकरता की काय, हा पण वाचला या अपघातातून, एक पाय गमावून.

गावातल्या ज्यांच्या ज्यांच्या कानावर ही गोष्ट पडली त्यांचे हृदय पिळवटून निघाले. त्याच्या कुटुंबाची झालेली ही वाताहात बघून, अशी बरीच लोकं ज्यांची फक्त तोंड ओळख होती, त्यांना सुद्धा त्यांच्या भावना आवरता आल्या नव्हत्या. – त्याच्या दुःखाला तर पारावारच राहिला नव्हता.

या अपघातानंतर त्याच्याकरिता जगण्यासारखं आता असं राहिलं तरी काय होतं? त्याने पण विष खाऊन आयुष्य संपवूनच टाकलं असतं जर... जर हा त्याचा लहान निरागस भाऊ त्याच्याकडे एकटक बघत चुपचाप त्याच्यासमोर उभा राहिला नसता, सुजलेले डोळे आणि विझलेली नजर घेऊन.

बरेच महिने त्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. मग घरी आला पण कायमसाठी अपंग बनून. स्वतः अपंग असूनही आता त्यालाच आधार देणारी काठी बनायचं होतं. समोर एक आयुष्य होतं ज्याला आकार देण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. आई-वडील-भाऊ सगळंच बनायचं होतं त्याला. मनावर दगड ठेवून तो भावाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायचा.

आयुष्यातले सर्व रंग उडून गेले आणि अचेतन स्वरूपात आयुष्य खुरटायला लागलं. एकटा असला की तो उदास व्हायचा, डोळ्यातून पाणी झरा झरा वाहू लागायचं, हताश होऊन भिंतीवर डोकं सुद्धा आपटायचा पण छोट्या भावाच्या समोर आपलं दुःख, आपली व्यथा त्याने अजिबात दाखविली नाही.

सरकारकडून त्याला मदत मिळाली. गावामध्ये किरकोळ काम पण मिळालं आणि हळूहळू हे नवजीवन त्याच्या अंगवळणी पडू लागलं.

मनामध्ये एक विचार अजूनही तग धरून होता की असं हातावर हात धरून बसून काय मिळणार ? आई-वडील नसले तरी काय झालं, त्यांच्या आठवणी तर आहेत; या जगात ते प्रत्यक्ष नसले तरी अदृश्य रुपात तर ते त्याच्या बरोबर नक्कीच आहेत. त्याची प्रगती, त्याचे सुख पाहूनच तर आई वडिलांच्या आत्म्याला सद्गती मिळेल. आपल्यासमोर आपले संपूर्ण आयुष्य तर पडलं आहेच शिवाय या छोट्याचं भविष्य पण तर आपल्याच हातात आहे. खरंतर आता चांगली नोकरी शोधायला पाहिजे. आई-वडील तर राहिले नाहीत आता पण त्यांच्या इच्छा-आकांक्षा कशा काय मरू द्यायच्या ? आता तो तसंच करेल जसं त्याने ते हयात असते तर केलं असतं.

त्याने पुन्हा परीक्षेची तयारी सुरु केली. फॉर्म भरला. अगदी मनापासून अभ्यासाला भिडला. सकाळी लवकर उठायचा. आपली काठी कुबडीसारखी टेकवत टेकवत बाजूच्या दुकानातून दूध घेऊन यायचा, आंघोळ पांघोळ उरकून लहान भावाला उठवायचा. मग नाश्ता बनवायचा. भाऊ शाळेत गेल्यावर मग दुपारचं जेवण बनवूनच स्वतःच्या कामावर जायचा.

आपल्या तुटक्या पायाकडे नजर जाताच कळ उठायची हृदयात. मग कातर नजरेनेच आजूबाजूला बघत कामाच्या जागी पोचायचा.

संध्याकाळी जेव्हा तो कामावरून घरी पोचायचा तेव्हा भाऊ शाळेतून घरी आलेला असायचा आणि त्याने जेऊन पण घेतलेलं असायचं. कधी तो त्याला घरीच भेटायचा , तर कधी शेजारी-पाजारी, मित्रांच्याकडे गेलेला असायचा. हा पण खाऊन पिऊन लगेच अभ्यासाला बसायचा.

कधी लहान्याला अभ्यासातलं अडलं तर समजवायचा. तो झोपल्यानंतर बराच वेळपर्यंत याचा अभ्यास चालू असायचा. ते दिवस आणि हे दिवस ! जमीन-आस्मानाचा फरक होता दोन्हीत. याचं वय जणू एकदम दहा वर्षांनी वाढलं होतं. वाढलेल्या वयाचा तो अगदी प्रौढ दिसू लागला होता. त्याच्या प्रत्येक गोष्टीत एक गंभीरता, पोक्तपणा आपोआपच आला होता.

कधी कधी एकटा असताना आपल्या पायावरून हात फिरवताना त्याच्या मनात विचार यायचा, माझं पण बाकीच्या लोकांसारखं झालं असतं तर या छोट्याचं काय झालं असतं ? कुठे गेला असता हा, कसा राहिला असता? नुसत्या विचारानेच थरकाप व्हायचा त्याचा, हमसून हमसून रडायला यायचं. पण सर्व काही दाबून टाकलेल्या हुंदक्यात आणि मोठ्या सुस्काऱ्यात विलीन व्हायचं. अपंग झाल्याचा सारा क्षोभ, सारी वेदना तो विसरायचा जेव्हा त्याच्या लक्षात यायचं की छोट्याचा आधार आता आपलेच अपंग शरीर आहे. हेच विकलांग शरीर दुसऱ्या अश्राप जीवाचे आधारस्थान आहे, पूर्णत्व आहे.

मग त्याच्या मनातली खिन्नता हळूहळू दूर होऊन आपल्या स्थितीबद्दल त्याला वाटणारं दुःख मग कुठल्याकुठे पळून जायचं.

एक पाय, एक हात, एक डोळा किंवा शरीराचा एक अवयव म्हणजे तर अवघे शरीर नसते. आणि मनुष्य तर शरीराहून कितीतरी अधिक आहे. ते स्थान, जिथे मानवता वास करते ते तर हृदयातल्या पेटीत सुरक्षित आहे. शरीराचा एखादा अवयव नसेल तरी माणूसकी तर राहतेच ना. मग जोपर्यंत माणसाचं हृदय चालू आहे, डोकं काम करतं आहे, तोपर्यंत त्याने इतर एखादा अवयय नसेल तर त्याची इतकी पर्वा का करावी? झाडाची एखादी फांदी तुटली तर सगळं झाडच्या झाड थोडंच वठतं? आणि सौंदर्याचाच विचार करायचा असेल तर ती तर अंतर्यामी पाहिजे. आपण सगळेच तर हाडावर मांस आणि कातडी चढविलेले पुतळे आहोत, ज्यांच्या आत जीवनप्रवाही रक्त खेळत असतं. त्यात कसलं आलं आहे सौंदर्य? आणि कुरूप म्हणजे तरी काय? श्वास चालू आहे तोवर सगळं सुंदर आहे, नंतर मजबूत बांधा काय आणि आरस्पानी सौंदर्य काय, सगळं मातीमोलाचं तर आहे.

मन निर्व्याज आहे, त्यात माणुसकी आहे, म्हणजे सगळं उत्तम आहे. तसही रंग रूपात काय ठेवलं आहे? रंग तर गाढवाचा पण पांढरा असतो, म्हणून काय आपण त्याला गोरा आणि सुंदर म्हणायचं? आणि कोकिळेच्या काळ्या रंगात काय वाईट आहे? जर सूरदास अंध असूनही जगाला योग्य मार्ग दाखवू शकतात तर याने फक्त एक पाय तर गमावला आहे. दोन्ही पाय गेले तरी आयुष्य थोडंच कधी थांबलं आहे? आणि हे काय कमी आहे की त्या घटनेने याची आयुष्याची दोरी तोडून टाकली नाही, नाहीतर देव न करो, पण असं झालंच असतं तर… विचार करता करता त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांसमोर लहान भावाची छबी तरळली.

शरीराची सुंदरताच जर सर्वकाही असेल तर रावणाकडे तर पुष्कळ होती, पण त्याला कोणी सुंदर मानलं?

जग खरं तर जग अशा लोकांमुळे त्रासलेले आहे जे आपल्या विचारांनी पांगळे असतात, आपल्या उद्दिष्टाला अपंग बनवितात, आपल्या विचारसरणीला विकृत बनवून टाकतात. त्यांचंच ओझं आहे समाजावर. एका अवयवाचे नसणे हा दोष कसा काय असू शकतो? आणि जेव्हा हे संपूर्ण शरीरच काळाच्या ऋणात आहे, नियतीच्या ताब्यात आहे, तर त्याच्या एका भागाबद्दल, नसण्याबद्दल इतकं दुःख कशाला?

आणि जेव्हा त्याची नजर आकाशात उगविलेल्या चंद्रावर गेली तेव्हा त्याला चंद्र नेहेमीपेक्षा जरा जास्तच चमकदार वाटला. धुकं हटल्यावर स्वच्छ दिसणाऱ्या नभासारखा.

त्याने अभ्यास तर केला होताच. रात्रीचा दिवस करत जीवतोड मेहनत केली होती. आपल्याबरोबर लहान्याचा पण अभ्यास घेतला होता. भावाच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्याचा पण त्याने आटोकाट प्रयत्न केला होता. राहून राहून आईची आठवण मात्र सारखी येत राहायची, गेल्या परीक्षेच्या वेळी ती ज्या तऱ्हेने त्याची काळजी घेत होती…

परीक्षेत पास झाला तो या वेळेस. इंटर-व्ह्यू पण उत्साह आणि पूर्ण आत्मविश्वासाने दिला होता त्याने.

दोन तीन महिने होऊन गेले आणि एक दिवस निकाल जाहीर झाला. या वेळेस तो निवडला गेला होता. विकलांग असणाऱ्यांच्या करीता ठेवलेल्या राखीव जागांमध्ये त्याचे नाव होते. त्याला जे पत्र मिळाले त्यातही हेच नमूद केले गेले होते की विकलांगांकरीता राखीव असणाऱ्या जागेवर तो निवडला गेला आहे.

वाचताच त्याला धक्का बसला. जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याने रात्रीचा दिवस केला तिथे तो नाही तर त्याचे पंगूपण पोचले होते. त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या जीवतोड मेहनतीला न मिळता त्याच्या एका छोट्याशा शारीरिक व्यंगाला मिळाले होते. त्याने अपरंपार कष्ट करून किल्ला सर करायचं ठरविलं, पण ते दान त्याच्या झोळीत भीक दिल्यासारखं पडलं.

डोळे भरून आले त्याचे. आई वडिलांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचा जो संकल्प त्याने सोडला होता, तो हा तर नक्कीच नव्हता. हार न मानता जे मिळविण्याकरीता तो परिस्थितीशी झुंज देत होता, ते याकरिता?. उद्दिष्ट गाठण्याकरीता झटून प्रयत्न करताना स्वतःच्या अपंगत्वाची तरी कुठे आठवण राहिली होती त्याला?

आणि त्याच्यावर उपकार करण्याचे कारण तरी काय होते? त्याचे डोळे नीट होते, बुद्धी शाबूत

होती, डोकं व्यवस्थित काम करत होतं, त्याने कष्ट पण तर केले होते… मग फक्त पायाने अधू असल्या कारणाने त्याला इतरांपेक्षा वेगळी वागणूक का ? त्याला असं हीन-दीन, दयनीय का ठरविलं गेलं ? जे अपंगत्व त्याने मनाच्या खोल कप्प्यात खूप आत दडवून ठेवलं होतं, त्याला असं जगासमोर उघडं-वाघडं का करण्यात आलं?

धाकटा मनातल्या मनात म्हणेल की अपंग झाल्याने या वर्षी भावाला पास करण्यात आलं असावं. गावकरी पण तर हेच समजतील की चला, अपंग असल्याचा काहीतरी तर उपायोग झाला बिचाऱ्याला.

नाही! त्याच्या हाताच्या मुठी घट्ट वळल्या गेल्या, डोळे घट्ट बंद झाले, अश्रू नाही, रक्त उतरलं त्याच्या डोळ्यात.

थरथरत्या हातांनी त्याने ते पत्र फाडायला सुरुवात केली. उदासीनतेचा डगला अडकवून, उपकाराची भावना असणाऱ्या नजरेसमोर आता तो उभा राहणार नव्हता, कधीच नाही. गावातच दुकान उघडेल स्वतःचे. नाहीतर दुसरे कुठलेही, जे मिळेल ते काम तो करेल. पण कोणाच्या दयेवर, भीकेवर आता तो क्षणभर पण जगू शकणार नाही. पत्राचे कपटे फरशीवर इकडे तिकडे विखुरले, जणू त्याच्या आई वडिलांनी त्याच्या यशाबद्दल फुलं उधळली असावीत, जणू त्यानेच उपकाराचे आणि दयेचे आपल्या हाताने छोटे छोटे तुकडे करून पायदळी तुडविले असावेत, जणू त्याच्या अंतर्मनातला माणूस अपंग होता होता वाचला असावा.

*********

अन्य रसप्रद विकल्प

शेयर करे

NEW REALESED