पोष्टमन काका निवृत्त होत आहेत..... Ashok Bheke द्वारा प्रेरक कथा में हिंदी पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करे

पोष्टमन काका निवृत्त होत आहेत.....

आरतीसम्राट सीतारामसुत *मोहन खामकर* नावाचा एक पोष्टमन टपाल खात्यातून निवृत्त होत आहे. आज मोहन नावाचा प्राणी जवळजवळ ६० वर्षाचा झाला. येत्या २७ एप्रिलला षष्टयाब्दीपूर्ती सोहळा आहे. आनंद गगनात मावेनासा झाला आहे. जवळजवळ चाळीस वर्षे सकल दुनियेची पत्रे घरोघर पोहचविली. मोहन जेव्हा पत्रे घेऊन सायकलीवर टांग टाकून गल्लोगल्ली अंगात खाकी अंगरखा, डोईवर खाकी टोपी, खांद्याला लटकवलेली खाकी पिशवी. हातात पत्र आणि हातात सायकल. घंटी वाजवून वर्दी देणारा दर्दी पोष्टमन आणि वाट पाहणारा टपालकरी यांच्यातील नाते म्हणजे जिव्हाळ्याचे नाते. मात्र मनातल्या मनात तुकोबाच्या अभंगानुसार *केव्हा भेटसी केशवा.....* हि तगमग म्हणजे पोष्टमन या व्यक्तीला लोकांनी ईश्वराचे रूप मानले आहे. टपाल मनीऑर्डर ज्याचे त्याला देत एकमेकांची सुख दु:ख कळविणारा आपला प्यारे मोहन रिटायर्ड होत आहे. आई गं येतो मी....! सांगत सिमेंवर लढण्यासाठी गेलेला जवान आपल्या आईला पत्र लिहून पाठवीत असे, तेव्हा या पोष्टमन काकाच्या हातातले पत्र पाहूनच धाय मोकळून रडणारी आई आणि त्याच्या खुशालीची बातमी वाचून खुशीतच आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत पुसत देवा, ईश्वरा माझ्या मुलासोबत या पोष्टमनला देखील उदंड आयुष्य दे.... म्हणून साकडे घालीत असे. याच मोहनला समिधा नावाच्या मुलीने वरले आणि बापाला सांगुन टाकले, *ह्योच नवरा हवा....!* दादरच्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात शुभमंगल झाले. लक्ष्मीला नारायण भेटले. नारायण काय,मोहन काय.....! एकाच ईश्वराची दोन नांवे.

सासरला आलेली लेक माहेरच्या पत्राची आतुरतेने वाट पाहत असायची. माहेरच्या मातीतले, तिथल्या माणसांचे सुख दुख ऐकायला व्याकूळ झालेली असायची. पिवळे पत्र असो वा निळेशार आंतरदेशीय पत्राची वाट पाहणारी, कुणा परपुरुषाशीं संवाद न साधणारी सून मात्र पोष्टमन काका म्हणून तितक्या आपुलकीने साद घालीत असे. ते पत्र लाखमोलाचे असायचे. माया प्रेमाने भरलेले असायचे. त्याकाळी सुंदर हस्ताक्षर असलेल्या पत्रलेखकांचा गौरव होत असे. एकेक पत्र सातवेळा वाचताना देखील कुणाला कन्टाळा येत नसे. तार घेऊन येणारा पोष्टमन मनात भीती निर्माण करायचा. त्या तारेतले शब्द संक्षिप्त असायचे. कळणाराला कळत असे.

मोहन खामकर यांची शरीरयष्टी जी चाळीस वर्षापूर्वी होती, ती आजही जशीच्या तशी आहे. त्यात किंचितही बदल झालेला मला तरी दिसत नाही. आजही शाळेची कपडे चढवून मोहनला आठवी नववीच्या वर्गात नेऊन बसविले तरी कुणाला कळणार नाही. खरंतर त्याला वाटेत कधी वाघोबा भेटलाच नाही. नाहीतर भीतीपोटी आजीकडे जातो, तूप रोटी खातो, जाडजूड होतो. असे म्हणाला असता आणि खरोखर तूपरोटी, लाडू खाऊन मस्त गबरू पहेलवान झाला असता. दिवसभर पायपीट करीत चाळीस वर्षाच्या सेवेत ज्याने वणवण फक्त भ्रमंती केली असेल त्याच्या अंगावर मुठभर तरी मांस चढेल का....! मोहन सारखे टपालसेवेत जे कामसू आहेत, त्यांची देखील आजच्या घडीला अवस्था तशीच आहे. मोहन लोकांच्या जवळचा माणूस. अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू. अनेकांच्या सुखदु:खचा, प्रगतीचा साथीदार. दु:खाची बातमी देताना देखील धीराने चार शब्द बोलणारा कळत नकळत समाजसेवेला वाहून घेतलेला हा घटक.

राजेश खन्ना या अभिनेत्यामुळे या पोष्टमनला *डाकिया डाक लाया....* या सिनेगीतामुळे खूप खूप हुरूप आला होता. वाळवंटात झरा भेटावा तसा राजेश खन्ना त्यांना भेटला होता. कारण त्याच्या चित्रपटामुळे पोष्टमन या सुख दु:ख वाटणारा आणि वेळ आली तर दुसऱ्याच्या दु:खाला कवटाळणारा पोष्टमन भारतीयांच्या मनात सहानुभूती घेऊन प्रकट झाला होता. *लिखे जो खत तुझे....!* *यह मेरा प्रेमपत्र पढकर....!* *चिठ्ठी आई है* किंवा *पत्र तुझे येतं अवचित* या हिंदी मराठी गीतकारांनी पोष्टमनला समाजातील महत्वाचा घटक म्हणून उदयास आणले. चला हवा येऊ द्या...! कार्यक्रमात भावनिक आणि सामाजिक संदेश देणारा पोष्ट्मन पाहिला असेलच.

*मोहन खामकर* अनुभवी माणूस.अनुभवातून आलेले शहाणपणाची शिदोरी इतकी भरलेली आहे की, ते पाहता त्यांचे आयुष्य समृध्द झाले आहे. हिरे कोणते आणि दगडगोटे कोणते, हे ज्याला ठाऊक असते. त्याचे अनुभव मात्र कोठे अहिशोबी तत्वज्ञान वितरीत करणारे नाही. मोहन खडकावरच्या कोंभाप्रमाणे ऊन वारा पाऊस अंगावर झेलीत घोडपदेवच्या मातीत वाढलेला आहे. खडकाभोवती मायेचा ओलावा निर्माण करून आपले पाय जमिनीत रोवून अवघाची संसार सुखाचा करीन म्हणत भक्कमपणे उभा राहिला. चहा आणि सिगारेटच्या अधीन झालेला. दिवसातून चहा या द्रवपदार्थावर मित्रांसाठी अगणित खर्च करणारा. त्याचा चहा प्याल्यावर मित्रांच्या अंगात उत्साह संचारतो, यथेच्छ थट्टा करीत मात्र चहाचे घोट आरामात घेताना मित्र देखील आपला मोहन म्हणत त्याच्या निरोगी आयुष्यासाठी भगवंतापुढे हात जोडून प्रार्थना करतात.

कधी पत्रातून आनंद देणारा तर कधी मन विदीर्ण करणारा पोष्टमन शाहीर खामकर यांच्या *हितंच हाय पण दिसत नाय,* या लोकनाट्य शीर्षकानुसार आजच्या घडीला दिसत नाही. आहेत पण तो खाकी रंग उठावदार नाही. खांद्याला शबनम पिशवी नाही. सायकल नाही आणि ट्रिंग ट्रिंग वाजणारी घंटी नाही. आजच्या विविध प्रसार माध्यमामुळे अथवा कुरियर पोष्ट या खाजगी कंपन्यामुळे पोष्टमन या समाजघटक दुर्लक्षित होऊ लागला आहे. चिंतनीय आहे. पण जग बदलत चालले आहे. पोष्टमनची आतुरतेने वाट पाहणारा टपालकरीच मुळात मोबाईल मधील व्हाटसअप नावाच्या चक्रव्युहात अडकला आहे. क्षणात समोरच्याशी संवाद साधला जात आहे. त्यामुळे सायकलवर टांग टाकून येणारा पोष्टमन खरंतर रिटायर्ड होत आहे. क्षणभर त्याच्याकडे पाहताना या सेवाभावी महात्म्याला मोहनला, लोकांच्या मनातल्या पोष्टमन काकाला पाहून गालातल्या गालात हसू आले. मोहन खामकर उर्वरीत जीवनात हसता खेळ्ता राहण्यासाठी आपल्याच मनाला सांगून मात्र झरझर चार शब्द शुभेच्छा देण्यासाठी कागदावर उतरले.

*अशोक भेके*